अकलूज : धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात रविवारी प्रवेश करणार आहेत. उद्या धैर्यशील यांचा वाढदिवस असून यावेळी खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूजमधील निवास्थानी जाणार आहेत. तब्बल वीस वर्षानंतर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्र येणार आहेत. सकाळी शिंदे आणि पवार हे मोहिते पाटलांच्या घरी भोजन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबीय प्रवेश करणार आहे.
वाढदिवस असल्याने माढा मतदारसंघातून सर्व मोहिते पाटील यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येत आहेत. गेल्या तीन पिढ्यांपासून आमच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यंदाची निवडणूक हाती घेतली. भारतीय जनता पक्षाने तिकीट देण्यास नकार दिल्यानंतर मी शांत बसलो होतो, मात्र कार्यकर्तेच स्वस्थ बसू देत नव्हते. रविवारी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघेजण घरी जेवायला येणार आहेत. त्यानंतर दुपारी आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे, अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे धाकटे बंधू रघुनाथ राजे निंबाळकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, कोणी काही सांगितलं, तरी मी तुतारीचे काम करणार आहे. युती धर्म पाळायला मी कोणत्याही पक्षात नाही. आमचा विरोध हा भारतीय जनता पक्षाला नाही, तर त्यांच्या उमेदवाराला आहे. आम्ही दोन नंबरवाले नसल्यामुळे आम्हाला ईडीची भीती नाही. रघुनाथ राजे यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आपण तुतारीचे काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.