पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी विशेष पथकाने काही थकीत कर असणाऱ्या मिळकती मंगळवारी (ता. १६) सिल केल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.
थकबाकी कराच्या रकमेची वसुली करण्यासाठी शॉपिंग सेंटरमधील एक गाळा, महाराष्ट्र बँक येथील खंबोलजा यांचा वरचा मजला, नचिकेत हायस्कूल, ओशो अपार्टमेंटमधील एक फ्लॅट, साई बार, आनंद भवन भागातील एक बंगला, वाईकर कॉटेजमधील एक कॉटेज, खालचे गावठाण येथील एक मिळकत, या मिळकती सील करण्यात आल्या.
या कामी नगरपरिषदेचे वसुली पथक प्रमुख कर अधीक्षक प्रणव पवार, मिळकत व्यवस्थापक धनंजय थोरात, रचना सहायक अमोल पवार, संगणक अभियंता प्रशांत सरोदे, लिपिक जयंती गुजर, लिपिक कालिदास शेंडगे, लिपिक राजश्री सणस आणि इतर कर्मचारी सूर्यकांत कासुर्डे, तानाजी कासुर्डे, प्रकाश हिरवे, अशपाक पठाण, नितीन मर्ढेकर, शशिकांत मोहिते, संदीप बगाडे यांनी सहभाग घेतला.
यामध्ये नचिकेत हायस्कूल व साई बार यांनी थकबाकी रक्कम तत्काळ भरल्याने त्यांच्या जप्त केलेल्या मिळकतीचे सील काढून टाकण्यात आले. नगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतधारकांनी त्यांचे येणे बाकी असलेली कराची रक्कम त्वरित नगरपरिषद कार्यालयात भरणा करण्यात यावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.