सांगली : सांगलीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुधगाव ते बिसूर रस्त्यावर प्रवासी रिक्षाला मालवाहतूक रिक्षाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मामी आणि भाचा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अश्विनी शीतल पाटील (वय-३५, रा. सिद्धेश्वर मंदिरजवळ, बुधगाव) आणि राघव रमेश पाटील (वय -१ वर्षे, रा. बिसूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, रिक्षा पलटी झाल्याने रिक्षातील दहाजण जखमी झाले आहेत. यामध्ये ललिता ज्ञानदेव पाटील, कावेरी रमेश पाटील, पौर्णिमा शैलेंद्र सावंत, सारिका शेखर पाटील, अश्विनी शीतल पाटील यांच्यासह स्वरा रमेश कोकाटे, समृद्धी शैलेंद्र सावंत, जयदीप शेखर पाटील, अवधूत शैलेंद्र सावंत, राघव पाटील या मुलांचा समावेश आहे.
अपघातानंतर तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, दुर्दैवाने अश्विनी पाटील आणि राघव पाटील या दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी रिक्षा चालक अरविंद महादेव पवार यांनी मालवाहतूक रिक्षा चालक महेश शिवाजी ओंकारे (रा.बिसूर) याच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या बुधगावचे ग्रामदैव सिद्धेश्वराची यात्रा सुरू आहे. त्यामुळे दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. २४ एप्रिल रोजी रात्री अरविंद पवार हे त्यांच्या रिक्षामधून दहा ते बारा जणांना घेऊन जेवण करण्यासाठी बिसूर ते कवलापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेले होते. रात्री दहाच्या सुमारास जेवण करून सर्वजण रिक्षातून बुधगावला परतत होते.
त्यावेळी बुधगावहून विसूरकडे तीन चाकी मालवाहतूक रिक्षा येत होती. मालवाहतूक रिक्षाने प्रवासी रिक्षाला उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत प्रवासी रिक्षा पलटी झाली. या घटनेत दहा ते बारा जण जखमी झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.