सांगली: सांगली जिल्ह्यामध्ये डान्सबारवर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी संपूर्ण महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी आणण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला होता, त्याच सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा डान्सबार सुरू असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात 10 जणांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेहून कर्नाटककडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ‘राही पॅलेस बार अँड रेस्टॉरंट’ नावाचे एक आलिशान हॉटेल आहे. या ठिकाणी कोल्हापूरसह इतर परजिल्ह्यातून तरुणींना खासगीरित्या बोलावून ग्राहकांना ‘व्हीआयपी सर्व्हिस’ दिली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच तरुणी, कवठेमंकाळ परिसरातील चार ग्राहक आणि बारचा व्यवस्थापक स्वप्नील कोरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
या धडक कारवाईमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी या बेकायदेशीर कृत्याप्रकरणी संबंधित बार मालकाविरुद्ध परवाना रद्द करण्याची आणि इतर कायदेशीर प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. सध्या पोलीस या बारचा अधिकृत परवाना, तेथे काम करणाऱ्या परजिल्ह्यातील तरुणींची ओळख आणि त्यांना नेमके कोणी आणि कोणत्या हेतूने बोलावले होते, या सर्व बाजूंचा सखोल तपास करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अटी-शर्तींसह डान्सबारला परवानगी दिली असली, तरी कोणत्याही अश्लील कृत्याला आणि नियमांच्या उल्लंघनाला कायद्याने बंदी आहे.







