पुणे: निगडी पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये गांजा आणि अफीम बाळगणे तसेच विक्रीच्या आरोपाखाली 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी आणखी एक मोठा आघात केला आहे.

निगडी पोलिसांनी ओटास्किम परिसरात कारवाई करत सनी शंकर थोरात (वय 20, रा. निगडी) याला ताब्यात घेतले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे सुमारे 40 ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे 2 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. अमली पदार्थ बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अमली पदार्थविरोधी पथकाने खेड तालुक्यातील सावरदरी गावात स्वतंत्र कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अफीम विक्रीसाठी आलेल्या तिघांवर नजर ठेवली होती. या कारवाईत भवरलाल सोनाराम जाट (वय 34, रा. चाकण), महेंद्रसिंग चिमणाराम (वय 25, रा. सावरदरी, ता. खेड) आणि मोहन धनराम जाट (वय 22, रा. सावरदरी, ता. खेड) यांना अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरून सावरदरी गावात अफीम विक्रीसाठी आले होते. त्यांच्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पथकाने सापळा रचून कारवाई केली. या दरम्यान मोहन आणि भवरलाल यांना ताब्यात घेण्यात आले, तर तपासादरम्यान इतर आरोपींचीही भूमिका समोर आली.
या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी अमली पदार्थ जप्त केले असून संबंधित आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून या प्रकरणामागील इतर दुवे शोधण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.






