कोल्हापूर: सोशल मीडियावर खोटी जाहिरात देऊन एका सेवानिवृत्त शिक्षिकेला व्हॉटस् अॅप ग्रुपला अँड केले. त्यानंतर १० ते २० टक्के डिस्काऊंटवर शेअर्स देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले. दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल ५८ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद सुनीता विद्याधर गाट (वय ६०, रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) यांनी गुरुवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
संशयित नरेश जडेजा आणि शिवांगी अगरवाल या दोघांनी सेवानिवृत्त शिक्षिका सुनीता गाट यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. त्यांना व्हॉटस् अॅप ग्रुपवर अँड केले. त्या ग्रुपवर वेगवेगळ्या बनावट जाहिराती पाठवून कमी कालावधीत जादा रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. १९ एप्रिल ते ३० मे २०२४ या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. त्याप्रमाणे गाट यांनी दीड महिन्यात ५८ लाख गुंतवले; मात्र त्यांना कोणताही परतावा आला नाही. फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुवार, ४ जुलै रोजी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.