सोलापूर : नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणाली पद्धतीने लोकार्पण झाले. सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच देश विदेशातील विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी हवाई सुविधा मिळणार असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सोलापूर विमानतळ येथे आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, सोलापूर विकास मंचचे केतन शहा, माजी खासदार डॉक्टर जयासिध्देश्र्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह सोलापुरातील व्यवसायीक, उद्योजक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना हा उपहार मिळाला आहे. सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहे. तिथल्या विमानतळाची सर्व प्रकारची क्षमता वाढवली असल्याने विठ्ठल भक्तांसह यात्रेकरूंना नवनवीन सुविधा मिळणार आहेत. देश विदेशातून येणाऱ्या भक्तांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला थेट सोलापूरला येता येणार आहे. यामुळे सोलापूर मध्ये व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.