कोल्हापूर : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून, बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू महाराजांना काँग्रेसकडून अधिकृतरित्या उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, महाराजांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याचे समोर आले होते. बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरलो असल्याचेही बाजीराव खाडे यांनी म्हटले होते.
याच कारणामुळे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठींकडून त्यांना निलंबित केले आहे. यासंबंधीचे पत्रक काढत निलंबनाचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात खाडे हेदेखील इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई झाली.