कोल्हापूर : महाराष्ट्रातील राजकारणात दिवसेंदिवस विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांना धारेवर धरले. ‘उद्धव ठाकरेंवर आलेली खूप संकटे मी झेलली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत. ज्या वेळेला बोलायची वेळ येईल, त्यावेळी मी बोलेन’, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. तसेच शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून पत्राद्वारे ५० कोटींची मागणी झाल्याचाही त्यांनी आरोप केला.
कोल्हापुरमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, ‘आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह जेव्हा मिळाले तेव्हा शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी रुपये मिळायला हवे, असे पत्र ठाकरेंनी आम्हाला पाठवले होते. यांना बाळासाहेबांचा विचार नको तर पैसे हवे होते. मी त्यांना ५० कोटी रुपये देऊन टाकले. हे पैसे मागताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज पाहिजे होती. आमच्यावर फक्त आरोपच करण्यात येत आहेत. आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आम्हाला तुमची संपत्ती नकोय, बाळासाहेब हीच आमची संपत्ती आहे, असे शिंदे म्हणाले.
तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या वेळी जर युती झाली असती तर मी मुख्यमंत्री झालो नसतो. मी त्यांना बोललो होतो युती करा. झालेली चूक सुधारु. पाचवेळा त्यांना सांगितले, आपण युती केली पाहिजे. शेवटी मला ते म्हणाले पुढील जी काय अडीच-तीन वर्षे आहेत ते ती आपल्याला देतील. पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे. शिवसेनेचे काहीही होऊ दे, असा नेता मी कधीच पाहिला नाही’.
सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाहीतर कॉमन मॅन
सीएम म्हणजे ‘चीफ मिनिस्टर’ नाही तर ‘कॉमन मॅन’. तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दाढीबाबत विधान केले होते. त्यावर ते म्हणाले, ‘दाढीला हलक्यात घेऊ नका. दाढीला जनतेची नाळ कळते. मी सांकेतिक बोलत आहे. जास्त बोलण्याची संधी मला देऊ नका. कोविडमध्ये फेसबुक करणारे कोण, पीपीई किट घालणारे कोण हे जनतेने पाहिलं आहे. मी लोकांना भेटायचो, तुम्ही खिचडीत पैसे खाले, डेडबॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले. कुठे कोण पैसे खायचे ते सर्व बाहेर येईल, तुम्ही फेसबुकवर खेळायचा हा एकनाथ शिंदे ‘फेस टू फेस’ खेळायचा, असेही ते म्हणाले.
‘मातोश्री’ आता उदास झाली
ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केलं पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकलं. ही शिवसेना कार्यकर्ते आहेत, असे कार्यकर्ते किती आहेत. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना ‘मातोश्री’ पवित्र मंदिर होते. पण आता ‘मातोश्री’ उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होती तिथं आता रडण्याचा आवाज येतोय. शिवसेना अशीच मोठी झाली नाही. रक्ताचे पाणी केले लोकांनी, घरावर तुळशीपत्र ठेवले. आयत्या पिठावर रांगोळीही नीट मारता आली नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. criticize demand 50 crores after receiving Shiv Sena and Dhanushyaban
मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवलं
याशिवाय, मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवण्याचं काम तुम्ही केलं. असला कोणता पक्षप्रमुख असतो जो नेत्यांचा पानउतारा करतो. कदमांचा मनोहर पंत करायचा होता. नारायण राणे, राज ठाकरे यांनी असे काय मागितलेले की त्यांचा तुम्हाला त्रास होत होता, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.