सोलापूर : सोलापुरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या १४ वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजय सिद्राम बट्टू असं मुलाची हत्या करणाऱ्या बापाचं नाव आहे. १३ जानेवारी रोजी विशाल विजय बट्टू हा सकाळपासून घरी आला नसल्याची तक्रार आई, वडील आणि नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातल्या तुळजापूर नाका परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सकाळी विशाल बट्टू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी लगेचच नातेवाईकांना बोलावून ओळख पटवली असता मृतदेह विशालचाच असल्याचे निष्पन्न झाले.
संशयाची सुई वडिलांकडे
पोलिसांना या प्रकरणी विशालचा घातपात झाल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी आधी आकस्मित मृत्यूची नोंद करत या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला होता. पोलिसांनी अनेकांची चौकशी केल्यानंतर संशयाची सुई ही वडिलांकडे जात होती. त्यातच आरोपी वडील विजय बट्टू याने पत्नी कीर्ती बट्टूकडे माझ्या हातून मोठी चूक झाल्याचे सांगितले. ही बाब लक्षात येताच कीर्ती यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.