पंढरपूर : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं मूळ रूप भाविकांच्या समोर आलं आहे. विठ्ठल रुक्मिण मंदिराच्या अंतर्भागात नव्याने करण्यात आलेले बांधकाम हटवण्याचे काम सुरु आहे. यावेळी मंदिराच्या हनुमान दरवाज्याखाली तळघर सापडल्याचं समोर आलं आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पदलवार यांनी मंदिरात तळघर आढळून आल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिले आहे.
सध्या विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. १५ मार्चपासून मंदिर संवर्धन व जिर्णोद्वार आराखड्यातील प्रस्तावित कामांपैकी बाजीराव पडसाळी, गर्भगृह, सोळखांबी, सभामंडप व इतर ठिकाणी काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून २ जून पासून पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आढळले तळघर
दरम्यान, गुरुवारी (दि. ३०) सोळखांबी परिसरात पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी हनुमान दरवाजाजवळ काम करत होते. त्यावेळी फरशीचा चूना निघाल्याने त्या ठिकाणी क्लिनिंग करत असताना एक दगड खचला. तो दगड काढल्यानंतर त्या ठिकाणी एक तळघर आढळून आले. तत्काळ मंदिर समितीती अधिकारी व वास्तु विशारद आबबळे यांनी पाहणी केली. त्यावेळी ते तळघर पाच ते दहा फूट असल्याचे समजले.
तळघरात दगडी मूर्ती आणि बरंच काही
मंदिरातील तळघरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवेश करून पाहणी केली असता काही मूर्ती आढळून आल्या आहेत. यामध्ये सात ते आठ प्रकारच्या दगडी मूर्ती, नाणी तळघरातून बाहेर काढण्यात आली असून अजूनही काही नवे अवशेष बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने सध्या मूर्तीची पाहणी करून अभ्यास करत आहेत. दरम्यान, मंदिराच्या तळघरामध्ये आणखी काय दडलं आहे? याचा शोध पुरातत्व खात्याकडून घेतला जात आहे.