पाचगणी (सातारा) : योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम लक्षात घेऊन पाचगणी रोटरी क्लब व आर्ट ऑफ लिव्हिंग पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शाळांना बरोबर घेऊन ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला.
पाचगणी येथील न्यू एरा हायस्कूलच्या सभागृहात एस.एम. बाथा हायस्कूल, बिलिमोरिया हायस्कूल, सेंट पीटर्स हायस्कूल, किमिन्स हायस्कूल, विद्या निकेतन स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल, गुरुकृपा हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल, न्यू एरा हायस्कूल, पाचगणी इंटरनॅशनल, अंजुमन हायस्कूल, स्कॉलर्स फाउंडेशन आणि संजीवन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन योग दिन साजरा केला. प्रशांत भिलारे आणि गणेश दाभीर यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगासने करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
दरवर्षी 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व काय आणि याच दिवशी योग दिन साजरा का केला जातो, याविषयी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी, सेक्रेटरी नितीन कासुर्डे, प्रमोद कासुर्डे, भारती गायकवाड, विनिता सक्सेना यांच्यासह रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.