सोलापूर : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाही आहेत. एक झाली की दुसरी अशा घटना घडत आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना राज्यभरातून अनेक अत्याचाराच्या घटना घडताना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. जागरण गोंधळास आलेल्या एका तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यास आलेल्या तरुणीबरोबर ओळख करून घेत लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी एका तरुणावर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास किसन गेजगे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पिडीत तरुणी २७ वर्षांची असून पुण्याची रहिवासी आहे. कुटुंबासह जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत २०२२ मध्ये ती पंढरपुरात आली होती. यावेळी तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक संबंध..
पिडीत तरुणीसोबत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान आरोपीने ओळख वाढवली. त्या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. डिसेंबर २०२२ मध्ये विकास याने तिला पंढरपुरात आणून भाड्याने खोली करून ठेवले. यादरम्यान २७ ऑगस्टपर्यंत २०२४ वेळोवेळी त्याने लग्नाचे अमिष दाखवत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यासाठी नकार दिल्यानंतर तो हाताने मारहाण सुद्धा करत असल्याची माहिती समोर आली आहे.
तरुणावर गुन्हा दाखल..
जागरण गोंधळाचे कार्यक्रम करण्यास नकार दिल्यावरही त्याने तिला मारहाण केली. तसेच आपल्या पिकअप वाहनाचे हप्ते भरण्यासाठी म्हणून त्याने तिच्याकडून एकूण ७५ हजार रूपये घेतले. अखेर लग्न करण्याबाबत तसेच वाहनाचे हप्ते भरण्यासाठी दिलेल्या पैशांविषयी विचारणा केल्यानंतर विकास याने मारहाण केली, अशा स्वरूपाची फिर्याद पिडीतीने शहर पोलीस ठाण्यात दिली. तरुणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.