कोल्हापूर: आई व मुलाच्या प्रेमळ नात्याला काळीमा फासणारी घटना सात वर्षांपूर्वी कोल्हापुरातील माकडवाला वसाहतीमध्ये पडली. या घटनेच्या कटू आठवणीने आजही तळपायाची आग मस्तकात जाते. करंट्या मुलाचा राग येतो. कोल्हापुरातील या घटनेने संपूर्ण राज्यात हाहाकार माजला होता. आईचा खून करून तिचे काळीज भाजून खाणाऱ्या मुलास जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही फाशी उच्य न्यायालयाने कायम करून आरोपीचा दयेचा अर्ज मंगळवारी फेटाळला.
दारू पिण्यासाठी आई पैसे देत नाही, या रागातून संतापलेल्या मुलाने धारदार चाकूने आई यल्लवा (वय ६३) यांचा खून केला. त्यानंतर पोट फाडून काळीज बाहेर काढले. ते काळीज तव्यावर भाजून चटणी मीठ लावून खाल्ले, अशा प्रकारचा निर्घृण व दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा करणारा आरोपी मुलगा सुनील रामा कुचकोरवी (यय ३५, रा. माकडवाला वसाहत) याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम केली.
२८ ऑगस्ट, २०१७ रोजी हा खून झाला होता. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवार, १ ऑक्टाबर रोजी आरोपी सुनील कुचकोरवी याची फाशीची शिक्षा कायम करत हा गुन्हा दुर्मिळ अतिशय गंभीर असल्याचे मत नोंदवले. कोलापूरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे व त्यांच्या पथकाने तपास केला होता.
कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकापासून पूर्वेला अर्ध्या किलोमीटर अंतरावर ताराराणी चौकाला लागून माकडवाला वसाहत आहे. या ठिकाणी यल्लवा कुचकोरवी (चप ६३) व त्यांचा मुलगा सुनील (वय ३५) असे दोघेजण रहात होते. सुनील याची पत्नी व मुले भांडण करून माहेरी निघून गेले होते. सुनीलला दारू व गांजाचे व्यसन होते. मोलमजूरी करून तो आपले व्यसन पूर्ण करीत होता. चिडक्या स्वभावाचा सुनील आई यल्लवा यांनाही वारंवार मारहाण करायचा. त्यामुळे यल्लवा काहीवेळा आपल्या मुलीच्या सासरी जाऊन राहायच्या.
खुनाची घटना घडण्यापूर्वी दोन दिवस अगोदर यल्लवा कुचकोरवी या माकडवाला वसाहत येथे मुलाच्या घरी आल्या होत्या. २८ ऑगस्ट, २०१७ रोजी सायंकाळी सुनील दारू पिऊन घरात आला. बाहेरच्या खोलीत झोपलेल्या आपल्या आईला लाथ मारून त्याने जागे केले. मला दारू पिण्यासाठी पैसे पाहिजे असे म्हणून दंगा केला. रागाच्या भरात सुनीलने यल्लवा यांच्या पोटावर चाकूचे वार करून खून केला. त्यानंतर आईचे पोट फाडून काळजी बाहेर काढले. चुलीवर तवा ठेवून तिखट-मीठ लावून काळीज भाजले आणि ते काळज खाल्ले. सुनील याच्या घरातून रक्ताचे पाट उंबरठ्यातून बाहेर रस्त्यावर येत होते. यावरून शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिल्यानंतर यल्लवा यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे व इतर हवालदार तानाजी चौगुले, सुरेश परीट, सागर माळवे, लक्ष्मण लोहार आदींच्या पथकाने तपास करून कोल्हापूर जिला न्यायालयात दोषारापत्र दाखल केले. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
आरोपी सुनील कुचकोरवी याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करून आपली फाशी रद्द होऊन जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी दयेची याचिका दाखल केली होती. या अर्जावर उच्च न्यायालयात न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे व न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण खटल्याची सर्व पार्श्वभूमी पाहून हा गुन्हा अतिशय दुर्मिळ असल्याचे मत मांडून आरोपीचा अर्ज फेटाळून त्याची फाशीची शिक्षा कायम केली.