सोलापूर : येथील मोदी स्मशानभुमीत एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील मोदी स्मशानभुमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जादू टोण्याच्या प्रकारासाठी मृतदेह नेला असल्याची गावभरात चर्चा सुरु असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांश वाघमारे असे 10 महिन्यांच्या मृत बाळाचे नाव आहे. प्रियांशला खेळताना इजा झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान 14 जून रोजी प्रियांशचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मोदी स्मशानभूमीत कुटुंबियांनी त्या मृत बाळावर अंत्यविधी केले. आज (दि.16) रविवार तिस-या दिवसाचा विधी करण्यासाठी वाघमारे यांचे नातेवाईक मोदी स्मशानभूमीत पोहोचले. मात्र मृतदेह पुरलेल्या ठिकाणी फक्त एक खड्डा आढळून आला. बाळाचा मृतदेह कुणीतरी उकरुन नेला असावा, असा संशय वाघमारे कुटुंबियांना आला आहे. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलीसांना दिली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या विरोधात नातेवाईकांनी पोलीसांत तक्रार केली असून पोलीस घटनास्थळी तपासासाठी दाखल झाले आहेत.