सोलापूर: कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी पुण्यात हत्या झाली. धमकी, खंडणी, हत्या यासारखे अनेक गंभीर गुन्हे असलेल्या मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली. मात्र, आता तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी शरद मोहोळचं उदात्तीकरण केल्याचे समोर येत आहे. ‘शरदभाऊची हत्या झाली, ते हिंदुत्ववादी होते, त्यांनी तुरूंगामध्ये जिहाद्याला मारले होते. त्यामुळे शरद मोहोळ यांच्यासाठी प्रार्थना करा’ अशा शब्दात आमदार टी राजा यांनी शरद मोहोळची भलामण केली. सोलापुरमध्ये आयोजित केलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चात ते बोलत होते. एक कुख्यात गुंड अनेक लोकांचा जीव घेतो, अनेकांना धमकावून खंडण्या गोळा करतो, अशा शरद मोहोळबाबत टी. राजा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.
शरद मोहोळ हा माझा मित्र, तो गोरक्षण करणारा होता, हिंदुत्ववादी होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली, असं वक्तव्य भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा यांनीसोलापुरात केलं. शरद मोहोळला परत पाठवा अशी देवाकडे प्रार्थना करा असं आवाहनही राजा यांनी केलं.