मोहोळ: भारतीय जनता पार्टीचे 2019 चे मोहोळ विधानसभेचे उमेदवार संजय क्षिरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षांमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यात भाजपला मोठी खिंडार पडले आहे. लोकसभा 2024 साठी संजय क्षिरसागर हे भाजपाकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय क्षिरसागर हे नाराज असल्याचे दिसत होते. त्यांना यशवंत सेनेची उमेदवारी देखील जाहीर झाली होती. मात्र, त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरु आहे, हे समजून येत नव्हते.
दरम्यान, संजय क्षिरसागर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यामध्ये त्यांनी सांगितले की, “मी गेली 25 वर्ष म्हणजेच 1998 – 99 पासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये काम केले. झेडपी, पंचायत समितीच्या अनेक निवडणूका लढवल्या. विधानसभेची निवडणूक लढवली. दहा लोकांपासून ते दहा हजार लोकांपर्यंतचे मोर्चे काढले. आंदोलने करून सामान्य लोकांच्या अन्यायावर प्रकाश टाकण्याचे काम केले. कठीण काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम केले.”
कार्यकर्त्यांविषयी व्यक्त केली खंत
संजय क्षिरसागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कार्यकर्त्यांविषयी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, या तालुक्यातील कार्यकर्ते व जनतेने गेली 25 वर्ष अनेक निवडणूकांमध्ये माझी पाठराखण केली. अनेक निवडणूकांमध्ये मला चांगले मताधिक्य दिले. यामध्ये माझा जय पराजय झाला. परंतु, ज्या लोकांनी माझी 25 वर्ष पाठराखण केली, त्या लोकांना मी काहीही देऊ शकलो नाही. याबाबत माझ्या मनामध्ये खंत आहे.
भाजप पक्ष सोडण्याचे कारण काय?
भारतीय जनता पक्ष सोडण्याचे कारण सांगताना संजय क्षिरसागर म्हणाले की, लोकसभेची मी चार वेळा उमेदवारी मागितली होती. मला ती मिळाली नाही, याचं मला फार दु:ख नाही. परंतु, पक्षांमध्ये मला अतिशय अपमानास्पद वागणूक 2006 पासून दिली गेली. 2014 मध्ये माझ्या पराभवानंतर पक्षाची इच्छा असताना सुद्धा जिल्ह्यातील काही नेत्यांच्या दबावामुळे पक्षाने माझ्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांच्या उपकाराचे ओझं हलकं करण्यासाठी मी भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
‘या’ दिवशी होणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षात प्रवेश
पुढे बोलताना क्षीरसागर यांनी सांगितले की, बुधवार 24 एप्रिल रोजी मोहोळ येथील मोहोळ-पंढरपूर रोडवरील श्रीराम मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षात प्रवेश करणार आहे. हा प्रवेश शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील व रोहित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना देखील पाठिंबा जाहीर करणार असल्याचे सांगितले.
सोलापूर लोकसभा 2024 निवडणुकीची उमेदवारी जाहीर होईपर्यंत भाजपामध्ये सक्रिय असणाऱ्या संजय क्षिरसागर यांनी राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे.