सोलापूर: सोलापूर शहरात विविध ठिकाणी बारा कावळे, दोन घार व एक बगळा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. दरम्यान, याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून H5N1 बर्ड फ्लूमुळे त्या पक्षाचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य यंत्रणा सर्वच पातळीवर सज्ज झाली आहे. या पक्षाच्या आजाराची माणसाला लागण होणार नाही. मात्र, दक्षता घेण्याची गरज आहे. यामुळे शहरातील विविध तीन ठिकाणे 21 दिवस प्रतिबंधित करण्यात आले आहेत.
पार्क चौपाटीनजीक असलेल्या किल्ला खंदकबाग, श्री सिध्देश्वर तलाव परिसर आणि धर्मवीर संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) या तिन्ही ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. विशाल येवले, सहायक आयुक्त डॉ. भास्कर पराडे आणि महापालिकेचे पशु शल्यचिकित्सक डॉ. सतोश चौगुले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या ठिकाणी बारा कावळे मृत्युमुखी पडल्याचे वन विभागाने पशुवैद्यकीय चिकित्सालय विभागाला कळविले आहे. 9 मार्च रोजी ही घटना घडली. 12 मृत कावळे वन विभागाने पशु चिकित्सालयात जमा केले होते. तसेच दोन घार व एक बगळा पक्षीही अचानक मृत्युमुखी पडले होते. तत्पूर्वी सहा मृत कावळे 9मार्चपूर्वी जमा करण्यात आले होते. त्यांचे शवविच्छेदन केले. त्यावरून उष्माघातामुळे किंवा विषबाधेमुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अहवाल जिल्हा आयुक्तांना पाठवण्यात आला होता.
त्यानंतर 9 मार्चला मृत पाच पक्ष्यांचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले. नुकताच भोपाळ येथील हाय सिक्युरिटी निमल डिसीज प्रयोगशाळेतून त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जवळपास 34 नमुने तपासणीसाठी पाठविले होते. सर्व नमुने H5N1 या व्हायरसने पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा पशुवैद्यकीय सर्वच चिकित्सालय विभागाच्या उपायुक्तांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना ही माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती डॉ. भास्कर पराडे यांनी दिली.
वन्य पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण घरगुती कोंबड्या, बदके किंवा इतर पक्षी यांना कोणताही आजार अथवा लागण झाल्याचे निदर्शनास आले नाही. कुक्कुटपालन केंद्र येथेही एकही मृत्यू आढळलेला नाही. घरगुती पक्ष्यांचे सुमारे 50 नमुने संकलित केले. ते पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. येथे चार दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. जर घरगुती पक्षांमध्ये बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळला, तर 0 ते 1किलोमीटर परिसर प्रतिबंधित करण्यात येणार आहे. दरम्यान, शास्त्रीय पद्धतीने मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे. प्राथमिक खबरदारी घेतली जात आहे. संबंधित तिन्ही ठिकाणी स्वच्छता आणि औषध फवारणी केली जात आहे.