माढा : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान, मनोरंजन, मोबाईल, संगणक, टीव्ही, फेसबुक, संगतगुणाचा प्रभाव, समाजातील आदर्शांचे घटत चाललेले प्रमाण, व्यसनाची आसक्ती, वाढती लोकसंख्या व बेरोजगारी आणि वाचनसंस्कृती लोप पावत चाललेल्या युगात मुलांना संस्कारक्षम, सुसंस्कृत व स्वावलंबी बनविणे हे पालक व शिक्षकांपुढे एक मोठे आव्हान असल्याचे माढा तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाचे शिक्षक महासंघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गुंड यांनी सांगितले.
टकरवाडी (ता.माढा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गोदावरी आणि लक्ष्मी वैद्य फाउंडेशन मुंबई यांच्या सौजन्याने व उद्योजक मुकुंद गवळी यांच्या सहकार्याने 55 हजार रुपयातून उभारण्यात आलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या आरो प्लांटचे उद्घाटन व गुणवंतांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, वाचनसंस्कृती लोप पावत चाललेल्या युगात मुलांना संस्कारक्षम, सुसंस्कृत व स्वावलंबी बनविणे हे पालक व शिक्षकांपुढे एक मोठे आव्हान आहे. हे जरी एक कटूसत्य असले तरी आजही अनेक होतकरू मुले जीवनात यशस्वी झाली आहेत. यासाठी पालक व शिक्षकांनी मनापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करुन अचूक मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख रमाकांत पवार यांनी सांगितले की, शहरी भागातील व इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणे ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्ययावत स्वरूपाच्या भौतिक सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून काही प्रमाणात मदत मिळते. परंतु, यावर सर्वच भौतिक सुविधा पूर्ण होत नाहीत. तेव्हा शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सुज्ञ ग्रामस्थांनी भौतिक सुविधा पुरविण्यासाठी यथाशक्ती मदत व सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नूतन केंद्रप्रमुख रमाकांत पवार, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिक्षक संघाच्या माढा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, उद्योजक मुकुंद गवळी, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रमेश पाचफुले, सेल्स मॅनेजर विशाल लाड यांचा हटकरवाडी शाळेच्या वतीने पगडी, शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आण्णासाहेब पाटील यांनी केले. सहशिक्षक प्रसन्न दिवाणजी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. उद्योजक मुकुंद गवळी, सेल्स मॅनेजर विशाल लाड, रमेश पाचफुले, अंकुश पाडूळे, धनाजी बगडे, अनिल सदगर, सागर बगडे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.