अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 2025 -26 च्या खरीप हंगामात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणच्या शेत विहिरी गाळाने पूर्णपणे भरून गेल्या, तर काही विहिरी खचल्याने वापरासाठी अयोग्य ठरल्या. त्यामुळे रब्बी हंगामात सिंचनाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. (Ahilyanagar news)
437 नुकसानग्रस्त शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी 63 लाख
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातील एकूण 437 नुकसानग्रस्त शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी 63 लाख 10 हजार 683 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना विहिरींची दुरुस्ती करून शेतीसाठी पुन्हा पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेली ही मदत मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
या आर्थिक मदतीच्या वितरणाचा प्रारंभ गुरुवारी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहा शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देण्यात आले. कार्यक्रमाला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत निधीचे वाटप पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
खरीप हंगामातील जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी साचून राहिले होते. याचा थेट परिणाम विहिरींवर झाला. काही विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला, तर काही ठिकाणी विहिरींचे बांधकाम खचल्याने त्या धोकादायक बनल्या. परिणामी रब्बी हंगामात पिकांना पाणी देणे अवघड झाले होते आणि अनेक शेतकऱ्यांना पाणी टँकरवर अवलंबून राहावे लागले होते.
या स्थितीचा आढावा घेत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने 13 ऑक्टोबर 2025 रोजी शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी विशेष आर्थिक मदत देण्याचे ठरवण्यात आले आहे. प्रत्यक्ष दुरुस्तीवर झालेला खर्च किंवा कमाल 30 हजार रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम मदत म्हणून देण्यात येणार आहे. याच निकषांनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे.
तालुकानिहाय मंजूर निधी पुढीलप्रमाणे:
तालुका विहिरींची संख्या निधी
राहुरी 49 विहिरी 7 लाख 32 हजार 844 रुपये
जामखेड 128 विहिरी 18 लाख 68 हजार 78 रुपये
शेवगाव 111 विहिरी 16 लाख 48 हजार 206 रुपये
श्रीरामपूर 46 विहिरी 6 लाख 60 हजार 603 रुपये
नेवासा 43 विहिरी 5 लाख 10 हजार 864 रुपये
संगमनेर 21 विहिरी 3 लाख 14 हजार 76 रुपये
कोपरगाव 12 विहिरी 4 लाख 4 हजार 400 रुपये
पारनेर 12 विहिरी 1 लाख 71 हजार 612 रुपये






