Loni Kalbhor : लोणी काळभोर, ता. 10 : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी (ता. 9) जाहीर होताच हवेली तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. हवेली पंचायत समितीच्या 12 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सर्वाधिक 6 जागांवर विजयी झाली असून भाजपाला 4, शिवसेना शिंदे गटाला 1 तर 1 जागा अपक्ष उमेदवाराने पटकावली आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 7 असताना कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. परिणामी, सत्तास्थापनेचा खेळ आता अपक्ष सदस्याभोवती फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर थेऊर पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार युवराज काकडे आणि कोरेगाव मूळ गणातील कृषिराज चौधरी हे दोघेही सभापती पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दोन्ही गटांकडून जोरदार हालचाली सुरू असून, पक्षांतर्गत चर्चा, संपर्क मोहिमा आणि राजकीय डावपेचांना वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवूनही बहुमतापासून एक पाऊल दूर असल्याने आता अपक्ष उमेदवार विद्या गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. लोणी काळभोर वडकी गणातून निवडून आलेल्या विद्या गायकवाड या थेट ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आल्या असून, त्यांच्या एका निर्णयावर संपूर्ण सत्तास्थापना अवलंबून राहणार आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांकडून अपक्ष सदस्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. पडद्यामागील राजकीय भेटीगाठी, फोनाफोनी आणि रणनीती आखण्याचे सत्र रंगात आले असून हवेली तालुक्याचे राजकारण सध्या तापले आहे.
दरम्यान, युवराज काकडे यांनी विकासकामांचा अनुभव आणि स्थानिक जनाधार यावर भर देत आपली दावेदारी मजबूत केली आहे. तर कृषिराज चौधरी यांनी संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा दाखवत सभापतीपदावर दावा सांगितला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतही अंतर्गत स्पर्धा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे राष्ट्रवादी सत्ता कायम ठेवण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे भाजप ‘ऑपरेशन पंचायत समिती’च्या माध्यमातून खेळीमेळीने सत्ता खेचण्याच्या प्रयत्नात आहे. या सत्तासंघर्षात विद्या गायकवाड कोणाला साथ देणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत हवेली पंचायत समितीचा सत्ताकिल्ला कोणाच्या ताब्यात जाणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे.
विजयी उमेदवार (कंसात गण)
राष्ट्रवादी
1) मनोज ऊर्फ कृषीराज चौधरी (कोरेगाव मूळ)
2) कोमल कांबळे (उरुळी कांचन)
3)युवराज काकडे (थेऊर)
4) सुषमा मुरकुटे (आव्हाळवाडी)
5)अमोल टेकाळे (कदमवाकवस्ती)
6) युवराज वांजळे (खानापूर)
भाजप
1) मोनिका कंद (लोणी कंद)
2)राणी वाळके (पेरणे)
3)कुशाल सातव (केसनंद)
4)सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी)
शिवसेना शिंदे गट
शुभांगी खिरीड (खेड शिवापूर)
अपक्ष
विद्या गायकवाड (लोणी काळभोर-वडकी)





