कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एक पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न समोर आला आहे. घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी करण्यात आल्याने हा नरबळीचा प्रयत्न होता का? अशी चर्चा परिसरात होत आहे. शरद माने यांच्या घरामध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील कौलव गावात हा प्रकार घडला आहे
हा संपूर्ण प्रकार कौलवचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळसह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नरबळी आणि जादुटोणा कायद्यान्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.