सातारा : सध्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांना साताऱ्यातील रॅलीदरम्यान भोवळ आल्याचा प्रकार समोर आला आहे. भाषण सुरु असतानाच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आणि ते अचानक व्यासपीठावर खाली बसले. यावेळी व्यासपिठावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाणी दिलं. यावेळी जरांगे यांच्या हाताला कंप फुटल्याचे देखील दिसले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेतल्यानंतर पुन्हा एकदा ते मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. साताऱ्यातील भाषणावेळी त्यांनी आपली प्रकृती ठिक नसल्याचा उल्लेख केला होता.
यावेळी भाषण करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, गेले साडे अकरा महिन्यांपासून मराठ्यांची आरक्षणाची लढाई सुरु आहे. ही लढाई कुण्या मोठ्या लोकांसाठी नाही तर गरजूवंत मराठ्यांसाठी आहे. माझ्या कमरेत आणि अंगात चमक भरत आहे. या शेवटच्या उपोषणामुळे हाल झाले. पण मी माझ्या मराठ्यांना उघड पडून द्यायचं नाही म्हणून जीवाची बाजी लावून मैदानात उभा राहिलो आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील गेले अनेक दिवस उपोषण करीत आहेत त्यांच्या डॉक्टरांचे उपचार देखील सुरु होते. त्यांना नीट औषधे घेऊन योग्य वेळेत आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतू त्यांना अशक्तपणामुळे चक्कर आली असल्याचे म्हटले जात आहे.