अहमदनगर: निसर्गाचे वरदान लाभलेल्या भंडारदरा जलाशयाचे नाव राज्य सरकारकडून बदलण्यात आले आहे. आता भंडारदरा जलाशय हे “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत आज (दि. ४) शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
भंडारदरा जलाशयाच्या नामकरणासाठी अनेक अर्ज शासनाला प्राप्त झाले होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासन निर्णयात म्हटले आहे की, “जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा जलाशयाचे आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण करण्याबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सदर जलाशयाचे “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.” त्यानंतर आज चार सप्टेंबर रोजी भंडारदरा जलाशयास “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्यात आले आहे.