बेळगाव : कौटुंबिक वादातून महिलेने दोन मुलांसह विहिरीत उडी मारुन जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना रविवारी (दि.29) सकाळी बोमनाळ (ता. रायबाग) येथे घडली आहे. महिलेने दोन मुलांसह जीवन का संपवली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
यल्लव्वा अर्जुन करीहोळे (वय-30), सातव्वा उर्फ स्वाती (वय-05), मुत्ताप्पा उर्फ सात्विक (दीड वर्ष) (तिघेही रा. बोमनाळ ता. रायबाग) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोमनाळ येथे अर्जुन करीहोळे हे पत्नी आणि मुलांसह एकत्र राहतात. शनिवारी (दि. 28) रोजी करीहोळे या पती पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरुन किरकोळ वाद झाले. यावेळी रागाच्या भरात यल्लवा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घरातून बाहेर निघाल्या. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी गावातील एका जुन्या विहीरीत दोन्ही मुलांना ढकलून दिले. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. बरेच तास उलटून गेल्यानंतर गावातील एका विहिरीजवळ शोध घेतल्यानंतर यल्लव्वा आणि तिची मुले विहीरीत सापडली.
घटनेची माहिती समजताच रायबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.एस.मंटूर व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी जावून तेथील पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी पती, दीर आणि सासुच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.
यावेळी घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांनी तीनही मृतदेह पाहून हंबरडा फोडला. या प्रकरणी पुढील चौकशी पोलीस करीत आहे.