पाचगणी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेला बाधा येवू न देता सर्वांनी गणेशोत्सव साजरा करावा. मिरवणूक काढताना डीजेचा वापर करु नये. त्याचबरोबर गणेशोत्सव साजरा करत असताना कोणत्याही धर्माच्या भावना दुःखवणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन वाई उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी केले.
पाचगणी येथील पालिकेच्या सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भालचिम बोलत होते. यावेळी पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुवणे, पाचगणी महावितरणचे सहाय्यक अभियंता चन्ना रेड्डी, पालिकेचे बांधकाम विभाग प्रमुख रवि कांबळे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सुर्यकांत कासुर्डे, आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले, गणेश मंडळांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, बेटी बचाव बेटी पढाव आदी सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा. जेणेकरुन समाजात आणि इतर गावात देखील आगळावेगळा संदेश जाईल.
सुर्यकांत कासुर्डे म्हणाले की, टेबल लॅन्ड पठारावरील तळवीचे खोलीकरण केले असून पालिकेच्या माध्यमातून टेबल लॅंन्ड तलावात विसर्जनासाठी तराफा तयार आला आहे. गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. या बैठकीला शहर व परिसरातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.