लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून दररोज नागरिकांचे लचके तोडत असल्याने पुणे प्राईम न्यूजने ‘पर्यटन नगरी पाचगणी शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; दररोज नागरिकांचे लचके तोडत असताना पालिका प्रशासनाचा कानाडोळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन चावणारी मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे पुणे प्राईम न्यूजचे नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.
गेली अनेक वर्षांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पाचगणी शहरात निवासी शाळा व होस्टेस मोठ्या प्रमाणात असल्याने शाळांचे शिल्लक राहिलेले अन्न मिळत असल्याने मोकाट कुत्र्यांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्राणी मित्रांच्या भीतीपोटी पालिका प्रशासनाचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाला धडक कारवाई करता येत नसल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शहरात मोकाट कुत्री दररोज नागरिकांचे लचके तोडत असल्याने प्राणीमित्र संघटनेविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांचे लचके तोडणाऱ्या मोकाट कुत्र्यांविषयी एवढेच प्रेम असेल तर प्राणीमित्र संघटने नागरिकांच्या पैशांचा अपव्यय न करता स्वखर्चाने ही कुत्री सांभाळावीत अशा संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.