अहमदनगर : अहमदनगरमधून एक भयंकर बातमी समोर आली आहे. रात्रीच्या वेळी पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र तेवढ्यात मुलीचे वडील आल्याने मुलगा अंधाराचा फायदा पळून गेला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. याबाबत जाब विचारायला गेलेल्या मुलीसह तिच्या वडिलांना जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ही धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या मुलगीवर एका मुलाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी वडील घराबाहेर आल्याने त्यांना मुलीचा आवाज ऐकू आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र मुलीच्या वडिलांना बघताच अंधाराचा फायदा घेत मुलगा तेथून पळून गेला आहे. अचानक घडलेल्या या सर्व प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती.
मुलांच्या कुटूंबाकडून मुलीसह वडिलांना मारहाण..
दरम्यान, मुलीने चेहरा ओळखल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घरी जाऊन सदरची घटना सांगितली असता संशयिताच्या कुटुंबीयांनी मुलीलाच जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सहा जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.