सोलापूर : विजेचा शॉक लागून एका शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या दहिटणेत गावात ही दुःखद घटना घडली आहे. अंबादास साळुंखे आणि कलावती साळुंखे असे मृत शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत. दोघेही शनिवारी दुपारच्या सुमारास शेतातील बाजरीवरील पाखरे हुसकवण्यासाठी शेतात गेले होते.
मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. पाखरे हुसकवताना महावितरणच्या तुटून पडलेल्या तारांना अंबादास साळुंखे यांचा अंगाचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला. पतीला वाचवण्यासाठी पत्नी कलावती यांनी बरेच प्रयत्न केले खरे परंतु, त्यांच्याही विजेच्या तारांना स्पर्श झाला. आजूबाजूला कुणीही नसल्याने दोघांचाही विजेच्या जोरदार धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
मृतदेह ठेवले पोलीस ठाण्यात आणून..
दरम्यान, साळुंखे दाम्पत्याच्या मृत्यूची वार्ता गावात कळताच, गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर होऊन गेला होता. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे या शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झालं असल्याचा आरोप साळुंखे दाम्पत्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी दोघांचेही मृतदेह अक्कलकोट पोलीस ठाण्यात आणून ठेवले. याप्रकरणातील दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
अक्कलकोट पोलिसांनी त्यांची समजूत काढत महावितरण कंपनीविरोधात गुन्हा आणि मृत कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदतीचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर साळुंखे दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. पती-पत्नीचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.