प्रमोद आहेर
श्रीगोंदा : 16 ते 22 जुलै 2024 दरम्यान थायलंड येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये 55 किलो वजन गटात महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची पै. धनश्री फंड हिने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. पहिली कुस्ती कझाकिस्तानच्या शुकुमारोवा सोबत 2-12 च्या गुणांनी धनश्रीने विजय मिळवला. त्यानंतर सेमिफायनलला चीनच्या चेन ली सोबत 10-13 च्या फरकाने धनश्रीने विजय मिळवत फायनलला धडक मारली व फायनलला जपानच्या युनो सोबत 4-6 च्या फरकाने धनश्रीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक खेचून आणले.
श्रीगोंदा इंटरनॅशनल कुस्ती संकुलाचे प्रमुख हनुमंत फंड यांची कन्या धनश्री फंड हिने नियमित सराव व कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कला शाखेत पदवीचे शिक्षण ती घेत आहे. पै. धनश्री फंड हिची ही सुवर्ण कामगिरी महिला कुस्ती खेळाडूंसाठी प्रेरणादायी व उत्साह वाढवणारी आहे. तिने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले, ही श्रीगोंदा तालुक्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.
पै. धनश्री फंडच्या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.संजय अहिवळे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना शा. शि .संचालिका कल्पना बागुल, हनुमंत फंड, सौ. पूजा फंड व प्रतीक सातव यांचे मार्गदर्शन लाभले.