शिरोळ : येथील आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिरढोण व अन्य भागात सुरू असलेल्या जवाहर, पंचगंगा साखर कारखान्यांच्या ऊसतोडी रोखल्या आहेत. साखर कारखाने गत हंगामातील २०० रुपये आणि चालू गळीत हंगामातील ३७०० रुपये जाहीर करत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नयेत, असे आवाहन अंकुश संघटनेने केले आहे.
शिरोळ येथे ऊसदराबाबत एल्गार परिषद घेऊन त्यांनी भूमिका जाहीर केली होती. तरीही काही साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांनी ऊसतोड घेतल्याचे समजताच आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाच्या फडात जाऊन चालू असणारी ऊसतोड बंद केली आहे. शेतकऱ्यांना जादा पैसे मिळावेत, यासाठी आम्ही लढा देत आहोत. ऊसतोड घेऊ नका; अन्यथा नुकसानीला जबाबदार राहाल, असा इशारा शेतकरी व ऊस तोडणी कामगारांना त्यांनी दिला.
शिरढोण येथे जवाहर साखर कारखान्यामार्फत अजित कोईक यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच आंदोलन अंकुशच्या प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चालू असलेली तोड बंद करण्यास भाग पाडले. उसाचा दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडी घेणार नसल्याचे मान्य करून शेतकऱ्यांनी चालू ऊसतोड बंद केली. यावेळी धनाजी चुडमुंगे यांच्यासह राकेश जगदाळे, नागेश काळे, पप्पू मुंगळे, महेश जाधव, एकनाथ माने, संपत मोडके, अनिल हुपरीकर, रशीद मुल्ला यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, कोयता बंद आंदोलन असल्याने पंचगंगा कारखान्याच्या प्रशासनाला आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी जाब विचारला. अर्जुनवाड, चिंचवाड, नांदणी, टाकवडे या गावांतील पंचगंगा, जवाहर, शरद कारखान्यांच्या तोडी बंद पाडल्या असल्याचे अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.