लहू चव्हाण
पाचगणी : हिल रेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी जतिन भिलारे यांच्या कामाची दखल ‘राष्ट्रीय महिला इतिहास संग्रहालय’ या अमेरिकन इतिहास संस्थेने घेतली आहे. त्यांचे नाव व हीलरेंजच्या शैक्षणिक कामाची महती या संग्रहालयात कायम राहणार आहे. यामुळे पुस्तकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या एका संस्थेचे आणि व्यक्तीचे काम परदेशात पोहोचल्याने भिलार गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबद्दल भिलारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रीय महिला इतिहास संग्रहालय (NWHM) हे एक संग्रहालय आणि एक अमेरिकन इतिहास संस्था आहे, जी जागतिक इतिहासाच्या संदर्भात आपल्या राष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात स्त्रियांच्या योगदानाचे संशोधन, संग्रह आणि प्रदर्शन करते. यात हील रेंजच्या संचालिका तेजस्विनी भिलारे यांनी स्थान मिळवले आहे.
तेजस्विनी भिलारे यांचे शिक्षण, एमए, बीएड झाले असून, त्या पांचगणी-भिलार परिसरात हिल रेंज एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या (कै.) बाळासाहेब भिलारे यांच्या त्या स्नुषा आहेत. निवासी इंग्रजी तसेच मराठी शाळेच्या माध्यमातून भिलारे यांनी विविध उपक्रम राबवून बाळासाहेब भिलारे यांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे. याची दखल घेवून त्यांना ‘द प्राइड ऑफ इंडिया-भास्कर’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
व्यवसायातील यशस्वी उद्योजक महिला २०१८, सकाळ-वुमन आयडॉल पुरस्कार वर्ष २०२२ आणि झाशी की राणी पुरस्कार वर्ष २०२३, महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रशंसनीय प्राचार्य, विशेष जीवनशैली मासिकात वैशिष्टिकृत असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अमेरिकन इतिहास संस्था राष्ट्रीय महिला इतिहास संग्रहालयाने तेजस्विनी भिलारे यांची दखल घेतल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.