अहमदनगर: तुमची आमच्याकडे असलेली अश्लील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देत बीड जिल्ह्यातील आष्टीच्या एका माजी आमदाराला ब्लॅकमेलिंग करून त्याच्याकडून एक कोटी 25 हजार रुपयाची खंडणी मागितल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्यात एका तथाकथित पत्रकारांसह दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर नगर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय तसेच माध्यम वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की, ‘तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे, ती सोशल मिडियावर व्हायरल करायची नसेल, तर आम्हाला एक कोटी 25000 रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी करत दोन महिलांसह एका युट्युब पोर्टल चालवणाऱ्या तथाकथित पत्रकाराने माजी आमदाराला ब्लॅकमेल करत होते.
सतत होणाऱ्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर या माजी आमदारांनी अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे संबंधित पोर्टलवाल्याने फिर्यादी यांच्याकडून 25 हजार रुपये देखील स्वीकारले होते.