Shalini Patil : सातारा : जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणाची टांगती तलवार अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या डोक्यावर आहे. कारण मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरू असले तरी ते पुढील चार महिन्यांत तुरुंगात जातील, असा हल्लाबोल शालिनी पाटील यांनी केला आहे.
“जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात माझा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या ईडीवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे या प्रकरणात मी आता हायकोर्टात याचिका करणार असून अजित पवारांना सश्रम कारावास देण्यात यावा, अशी मागणी करणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी ते पुढील चार महिन्यांत तुरुंगात जातील,” असा हल्लाबोल शालिनी पाटील यांनी केला आहे.
बारामती इथं बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावत पवार यांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्याविरोधात केलेल्या बंडाची आठवण करून दिली. काही लोकांनी ३८ व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली होती. आम्ही वयाच्या साठीनंतर अशी भूमिका घेतली, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी १९७८ मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख केल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी याबाबत भाष्य करत अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना शालिनी पाटील यांनी म्हटलं आहे की, “अजित पवार तर तुरुंगात जातील, त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही. एकनाथ शिंदेही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. कारण त्यांना शेतकऱ्यांसह इतर प्रश्न सोडवण्यात अपयश आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात. कारण त्यांनी त्यांच्या पक्षाचा विश्वासघात केला नाही,” असं शालिनी पाटील म्हणाल्या.