सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा आग्रह धरला आहे. तसेच राज्यात सध्या 62 टक्के आरक्षण असून मराठा समाजाला उरलेल्या 38 टक्क्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, ओबीसीमधील आरक्षणाला धक्का न लावता आणि सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार असल्याची स्पष्टोक्ती अजित पवार यांनी केली. मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करत पवार यांनी एकदाची जातनिहाय जनगणना होऊनच जाऊद्या, नेमकी आकडेवारी तरी समोर येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर होते. पवारांच्या उपस्थितीत विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना गाळप हंगाम कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्यांनी केलेल्या आपल्या भाषणात म्हटले की, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात याची जाणीव सध्या कमी होत चालली असून विनाकारण सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल करत असतात. एकीकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याची मागणी होते तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज म्हणतो यात आमच्या 350 जाती आहेत. आमच्यातील अनेक जातींना आरक्षण मिळत नसताना मराठा समाजाला आमच्यातून आरक्षण नको. धनगर समाज म्हणतो आम्हाला एसटी प्रवर्गात आरक्षण पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला आदिवासी आरक्षण असणारे याला विरोध करत आहेत. त्यामुळेच कोणाचेही काढून दुसऱ्याला आरक्षण देणे म्हणजे त्या 52 टक्क्यांना अंगावर घेण्यासारखे आहे. त्यामुळे ही दुसरी बाजू कोणी समजून घेत नाही आणि आजची तरुण पिढी विशेषतः मराठा समाजातील तरुण तरुणींची समजून घेण्याची मनस्थिती मानसिकता नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.