Ahmednagar MIDC अहमदनगर : अहमदनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. रात्री उशिरा याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे.
एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांना अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी अंतर्गत एका ठेकेदाराने 100 एमएम व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाच्या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर गेल्या वेळचे बिल आउट वर्डवर घेऊन तत्कालीन अभियंताची स्वाक्षरी घेण्यासाठी सहाय्यक अभियंता गायकवाड यांनी फिर्यादी ठेकेदार यांच्याकडे एक कोटी रुपये लाच मागितली होती. त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने सहाय्यक अभियंता गायकवाडला एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका शासकीय ठेकेदाराने नाशिकच्या एसीबी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. या कारवाईबाबत अतिशय गोपनीयता बाळगण्यात आली होती. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे. यामुळे एमआयडीसीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50 टक्के वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या गायकवाड यांनी दिली आहे.