पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर व तरडे परिसरात इंधन माफियांनी इंधन चोरी करून धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर पोलिसांनी छापे टाकून इंधनचोरीचे एक रॅकेट ही उध्वस्त केले आहे. तर पोलीस प्रशासनाकडून इंधनमाफियांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. या घटना ताज्या असतानाच, आता पुण्यानंतर सोलापूर जिल्ह्यात इंधनचोरीचे रॅकेट सक्रीय असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या इंधनचोरीचा व्हिडीओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा तेल डेपो आहे. या तेल डेपोमधून, कंपनीच्या सहाय्याने जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपाना टॅंकरमधुन पेट्रोल व डिझेल पुरवठा केला जातो. मात्र इंधन डेपोमधून थेट पंपाना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणारे काही ठराविक टँकर मालक आणि चालक “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून शेकडो लिटर पेट्रोल व डिझेलची चोरी करत असल्याची चर्चा सुरु होती. मात्र या चर्चेला “पुणे प्राईम न्यूज”च्या हाती लागलेल्या व्हिडीओमुळे बळकटी आली आहे. विशेष म्हणजे “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून होणाऱ्या वरील इंधन चोरी प्रकरणात इंधन डेपोमधील काहीजण सहभागी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.
पाकणी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा तेल डेपोमधून पंपाना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणारे शेकडो टँकर आहेत. यातील काही टँकर चालक विविध प्रकारे टॅंकरमधील इंधनाची चोरी करत असल्याचे दिसून येत आहे. तर इंधाचोरीचा एक व्हिडीओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, टँकरच्या कॅबीन जवळ एक छुपी पाईपलाईन आहे. या पाईपलाईनच्या नळातून इंधन येत असून ड्रम भरला जात आहे. यामुळे इंधन माफिया सोलापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात सक्रीय झाला असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी 4 ते 5 तरुणांनी सावळेश्वर टोलनाक्याजवळ एक टॅंकर मोहोळ पोलिसांना पकडून दिला होता. पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी आर्थिक हितसंबंधापोटी टॅंकर सोडून दिला आहे. यामागे खूप मोठी डील झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोरदार रंगली आहे. तर याबाबतची माहिती डेपो व्यवस्थापकाला देण्यात आली होती. मात्र त्याच्याकडूनही अद्याप कारवाई न केल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे याच्या पाठीमागे खूप मोठे रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
View this post on Instagram
याबाबत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीतून इंधन वाहतूक करणाऱ्या एका टँकर चालकाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील काही टँकर चालकांनी “अंडर पाईपलाईन सिस्टिम” बसवून घेतली आहे. पेट्रोलियम कंपनीशी वाहतूक करार असलेल्या टँकरपैकी दहा टक्क्यांहून अधिक टँकरमध्ये चोर कप्पे अथवा वरील सिस्टीम बसवलेली आहे. या माध्यमातून मोठी यंत्रणा कार्यरत आहे. यामध्ये कंपनीचे काही अधिकारी सहभागी असल्याचा आरोप यावेळी संबधित टॅंकर चालकाने केला आहे.
“अंडर पाईपलाईन सिस्टिम”द्वारे अशी केली जाते चोरी…
इंधनवाहू टॅंकर ते थेट टॅंकरच्या टाकीपर्यंत कोणाच्याही लक्षात येणार नाही. याची काळजी घेऊन, एक छोटीसी पाईपलाईन टाकली जाते. या पाईपलाईनमधून इंधनाचा पुरवठा चालु बंद करता यावा, यासाठी टॅंकरच्या इंधन टाकीजवळ अथवा टॅंकरच्या केबीनमध्ये कॉक बसवला जातो. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या डेपोमधून टॅंकरमध्ये इंधन भरल्यानंतर, काही वेळातच या पाईपलाईनमधून दोनशे लिटरपासून ते चारशे लिटरपर्यंत हळूहळू टॅंकरच्या टाकीत जमा होते. त्यानंतर हे इंधन खुल्या बाजारात विकले जाते. “अंडर पाईपलाईन सिस्टिम” बनविण्यासाठी सुमारे 50 हजार ते १ लाख रुपयांपर्यंत ओळखीनुसार खर्च येत असल्याची गोयानीय माहिती समोर येत आहे.
“अंडर पाईपलाईन सिस्टिम”चा आर्थिक फटका नेमका कोणाला?
पेट्रोलियम कंपन्यात टँकरमध्ये नेमके किती लिटर इंधन भरले, याचे मोजमाप तेल कंपन्यांच्या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून केले जाते. तर दुसरीकडे इंधनाची वाहतूक करणारा टॅंकर पेट्रोल पंपावर पोहचताच, पंप चालकांकडून विशिष्ट सळईच्या (डिप) च्या माध्यमातून टॅंकरमध्ये किती लिटर इंधन आहे, याची तपासणी केली जाते. तपासणीत पंप चालकाला योग्य वाटले तरच, इंधन खाली करण्यास परवागी दिली जाते. इंधन खाली केल्यानंतर पंप मालकाचा एक माणूस टॅंकरवर जाऊन टॅंकर खाली झाला का नाही? याची पहाणी करतो. मात्र, याच प्रवासात “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून टँकर चालक शंभर लिटरपासून ते थेट दोनशे लिटरपर्यंत इंधनाची चोरी करतो, असा आरोप आहे. जर पंप चालकाला चोरीचा फटका बसत नसेल, तर याचा आर्थिक फटका तेल कंपन्यांना बसत असला पाहिजे. मात्र, चोरी कॅमेऱ्यात पकडली जाऊनही, कंपनीचे अधिकारी गप्प का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.