पाचगणी,दि.२१ : अतिसंवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून घोषित असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात अनधिकृत बांधकाम नेहमीच चर्चेचा विषय बनून राहिलेला आहे. भोसे व दांडेघर येथील अनधिकृत बांधकामावर आज (दि. २१) अचानक एकाच वेळी जिल्हा प्रशासनाने सकाळी सातच्या सुमारास हातोडा मारला. महाबळेश्वर तालुक्यातील दोन ठिकाणी ही कारवाई झाली असून यामध्ये भौसे येथील सर्वे नंबर २७/४२ सचिन शिवाजी पाटील यांचे ३० फूट लांब व २० फूट रुंदीचे बांधकाम, दांडेघर येथील सर्वे नंबर १० थाप्यावरील अवैध शेड अशा बांधकामावर प्रसानाने बुलडोझर फिरवला.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामावर ही कारवाईची मोहीम आज सकाळी नियोजनबध्द रित्या सुरू झाली. यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार विनोद सावंत, जहिदा शेख, महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, पाचगणीचे निखिल जाधव, पालिका कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
पाच ते सहा जेसीबीच्या साह्याने अनधिकृत बांधकामे उध्वस्त करण्यात आली. ही अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम नियोजनबध्द रित्या राबवली गेली. सकाळी कुणालाही समजण्याआधी सर्व यंत्रणा ठरलेल्या बांधकामांवर पोहोचली. या मोहिमेची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. सकाळी अचानक मोहीम सुरू करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. जेसीबी मशीनच्या साहाय्याने अनाधिकृत इमारतीचे बांधकाम उदध्वस्त करण्यात आले. या कारवाईने अनेक बांधकाम व्यवसायिक व बांधकाम मालक यांचे धाबे दणाणले आहेत.