सोलापूर : मतिमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरज केंद्रे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गणेश अभिमन्यू माने (वय-४२, रा. कौठाळी, ता. उत्तर सोलापूर) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
६ डिसेंबर २०२० रोजी रात्री पिडीता ही तिच्या घरातील खोलीत झोपली असता आरोपी गणेश माने याने पिडीतेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक देवडे यांनी तपास करून आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले.
या खटल्यात सरकारच्यावतीने ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीतेचा भाऊ आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन गणेश माने यास १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद तसेच १ व सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी सरकारच्यावतीने अॅड. शीतल डोके यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड. सागर पवार यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस कर्मचारी रंजना जमादार यांनी काम पाहिले.