सांगली : सांगलीतील जत तालुक्यात वाळू चोरी करताना तरुणाच्या अंगावर वाळूचा ढिगारा कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सचिन सयाप्पा कुलाळ (वय 25, रा. कुलाळवाडी, खंडनाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. जत मधील बोर नदीपात्रात ही घटना घडली. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन वाळू तस्करांवर गुन्हा दाखल केला असून एका वाळू तस्कराला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जत तालुक्यातील खंडनाळ येथे वाळू चोरी करताना तरुणाच्या अंगावर वाळूचा ढिगारा कोसळून त्या तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना जत मधील बोर नदीपात्रात घडली. यामध्ये संशयित आरोपी सुरेश टेंगले, बिरुदेव टेंगल या दोघांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित आरोपींनी वाळू चोरी करण्यासाठी सचिनला जबरदस्तीने वाळू भरण्यासाठी नेले होते. वाळूच्या खोल खड्यामधून वाळू उपसा करताना बाजूचा ढिगारा कोसळेल याची माहिती असताना देखील रात्रीच्या अंधारात वाळू उपसायचे काम लावले. त्यामुळे ढिगारा अंगावर पडल्याने त्याखाली सापडून सचिनचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमकं काय घडल?
सचिन कुलाळ हा पत्नी, मुले, आई- वडीलांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री गावातील ट्रॅक्टर मालक सुरेश टेंगले यांनी त्याला वाळू भरण्यासाठी नेले. रात्री चार-पाच मजूर मिळून वाळूचे ट्रॅक्टर बोर नदीपात्रात भरत होते. वाळू उपसल्याने खोल खड्डा पडला होता. वाळू उपसताना बाजूचा ढिगारा थेट अंगावरच कोसळला. सचिन पुढे असल्याने ढिगाऱ्याखाली सापडला. तो जागेवरच बेशुद्ध पडला. या दुर्घटनेत मजूर आकारम करे हा जखमी झाला. त्याला मुका मार लागला आहे. सचिनला तत्काळ जत येथील खासगी दवाखान्यात दाखल केले.मात्र शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.