सोलापूर : आपल्याला नोकरीवरुन कमी केल्याचा राग मनात धरुन तरुणाने अधिका-यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल बाबासाहेब पाटील असे आरोपीचे नाव आहे तर अधिका-याचे नाव आबासाहेब हरी पवार असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी माळशिरस तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आरोपी अमोल पाटील हा माळशिरस तालुका पंचायत समिती कार्यालयात नोकरीवर होता. परंतु कामात कुचराईपणा करत असल्यामुळे त्याची चौकशी करण्यात आली. त्याची चौकशी होऊन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य अधिका-यांच्या आदेशानुसार अमोल पाटील ला नोकरीवरुन कमी करण्यात आले. या कारणामुळे तो अस्वस्थ होता. त्यामुळे या रागामुळेच त्याने गट विकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्या शासकीय बंगल्यात घुसून त्यांच्यावर काठीने हल्ला केला.
याबरोबरच त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये त्याने बळजबरीने काढून घेतले. तसेच यावेळी त्याने अधिका-याला धमकी देत म्हणाला,”तुमच्यामुळे माझी नोकरी गेली, तुम्ही मला कामावर घ्या नाहीतर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. माळशिरसमध्ये तुम्ही नोकरी कशी करतात तेच मी बघतो.” अशीधमकीही आरोपीने अधिका-यासह दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.