सातारा : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान पार पडले आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील सातारा विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील मोर्वे येथील मतदान केंद्रावर मतदान करत असताना एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
श्याम नानासाहेब धायगुडे (वय 67) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी श्याम धायगुडे हे मतदान केंद्रावर आले होते. ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतर ईव्हीएम मशिनकडे गेले. त्यांनी बटण दाबले आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते जागीच कोसळल्यानं मतदान केंद्रावरील कर्मचार्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, धायगुडे यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेमुळे मोर्वे गावावर शोककळा पसरली आहे.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता श्याम धायगुडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात ही दुःखाची घटना घडली असतानाही गावातील नागरिकांनी या लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होत गावातील नागरिकांनी 71 टक्के मतदान केले. शिवाय धायगुडे यांच्या कुटुंबातीलही लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.