कराड : पाटण (जि.सातारा) येथून निवडणुकीचा बंदोबस्त संपवूव परत येत असताना पोलीसांच्या खासगी आराम बसचा सकाळी दहाच्या दरम्यान अपघात (accident) झाला. यावेळी या अपघातात 15 कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील तिघेजण गंभीर जखमी झालेत. कराड पाटण रस्त्यावरील गोटे गावच्या परिसरातील हा अपघात झाला आहे. संबंधित कर्मचारी तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी आहेत.
अतीदक्षता विभागात उपचार सुरु असलेल्या कर्मचा-यांची नावे संदीप पवार, लक्ष्मण सुतार आणि अजीत नलवडे अशी आहेत. तसेच अन्य जवळपास 15 पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. खासगी आराम बस रस्त्या पलिकडच्या पडक्या घराला जावून धडकली असल्यामुळे समोरुन येणा-या ट्रकने हुलकावणी दिल्याने अपघात झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
यावेळी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील बंदोबस्तासाठी तु्र्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी पाटण येथे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आले होते. दरम्यान बंदोबस्त आटोपून ते पुन्हा परत निघाले. कराड नजीकच्या गोटे येथे येताच समोरुन आयेशार ट्रक भरधाव आला. त्याने हुलकावणी दिल्याने पोलीसांच्या आराम बसच्या (एम.एच.50,एन-5020) चालकाने ती चुकवणीसाठी रस्त्याच्या कडेला वाहन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आराम बस रस्त्याच्या कडेच्या गटारीसह पडक्या घराला धडकली.
या अपघातात जवळपास 15 कर्मचारी किरकोळ जखमी तर बाकीचे तीनजण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर कराडच्या अतीदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अन्य 15 कर्मचा-यांना किरकोळ मार लागलेल्यांना उपचार करुन सोडण्यात आले आहे.
यावेळी अपघाताची माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकून, पोलीस निरिक्षक के.एन.पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथून जखमींना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्यात आले. अधीक्षक समीर शेख यांनी अपघातातील जखमींची भेट घेवून विचारपूस केली. तसेच आराम बसला आडवा येणारा ट्रक आणि च्याच्या चालकासह ताब्यात घेतला आहे.