कोल्हापुर : कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी (ता. 18) रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरात घडली. अमर भिमगोंडा देसाई (वय-३९, सध्या रा. संकेश्वर रोड, मूळ रा. नूल, ता. गडहिंग्लज) असे या जवानाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मूळचे नूल गावचे असलेले अमर हे पत्नीसह गडहिंग्लजला संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्याजवळ भाडोत्री घरात राहण्यास आहेत. अमर ड्युटीवर गेल्यानंतर पत्नी एकटीच घरी असते. काही दिवसापूर्वी अमर सुट्टी घेऊन घरी आले आहेत. दरम्यान, गुरूवारी रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातच पत्नी आणि तिच्या अज्ञात साथीदाराने अमरचे हात-पाय आणि डोळे बांधून त्याला नाकावाटे व तोंडावाटे विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी अमरने आरडा ओरडा केल्याने शेजारील नागरिकांनी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी अज्ञात साथीदाराने खाडे नावच्या नागरिकाच्या डोक्यात मारून तेथून पळून गेला. त्यानंतर नागरिकांनी जखमी खाडे आणि अमर यांना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अमर यांना कोल्हापुरच्या सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अमर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पत्नी आणि अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.