कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सख्या बहिण भावाने राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली आहे. अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी आईच निधन झालं होतं. आईचा विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित सख्या बहिण भावाने राजाराम तलावात उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये, असे दोन्ही भावडांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. राजारामपुरी पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी या सख्ख्या भावडांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हे दोघेही अविवाहित होते. आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचं अडीच महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर भूषण आणि भाग्यश्री हे दोघेही बहिण भाऊ नैराश्यात होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आत्महत्या करत आहोत तसेच आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये, असं म्हटलं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.