सांगली : सांगलीतून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाड्याने राहायला जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून नवऱ्याने बायकोच्या डोक्यात खोरे खोरे घालून हत्या केली आहे. ही घटना बुधवारी ३ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सलमा गुराप्पा इकुरोट्टी (वय-२८, रा. खानापूर नाका, विटा, ता. खानापूर) असे या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पती गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी (वय-३०, सध्या रा. खानापूर नाका, विटा ता. खानापूर, मूळ रा. याडहळ्ळी ता. शोरपुराजि, जि. यादगीर राज्य कर्नाटक) याला विटा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश अरूण संकपाळ यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानापूर नाक्याजवळ विजय उथळे यांच्या मालकीच्या खोलीत गुराप्पा इकुरोट्टी आणि त्याची पत्नी सलमा इकुरोट्टी हे दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून भाड्याने रहात होते. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते.
३ जुलै रोजी रात्री आठ वाजल्यापासून त्यांच्यात भाड्याची खोली बदलून दुसरीकडे राहायला जाऊ, या कारणावरून जोरदार भांडण सुरू होती. या वादातून आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नी सलमाच्या डोक्यात लोखंडी खोरे घातले. यामध्ये पत्नी सलमाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्ष शरद मेमाणे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन करीत आहेत.