सोलापूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून त्यामध्ये महायुतीचा बहुमताने विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला दारुण पराभव आला आहे. निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमबाबत शंका घेतली जात असतानाच माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मारकडवाडी गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. यावेळी मात्र भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाकडून स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे.
निवेदनात नेमकं काय?
निवेदनात मौजे मारकडवाडीमधील चाचणी निवडणूक घेण्यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या गावात यंदाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते मिळाली असून विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचे सांगितले आहे. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे. यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
मारकडवाडी ग्रामस्थांचा मोठा निर्णय…
बॅलेटवरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास दिल्या असून गावातील प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्याला मतदान केले त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. वास्तविक या निवडणुकीत मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्र आल्याने शरद पवार गटाला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याची अपेक्षा होती.परंतु, निवडणूक निकाल येताच जानकर हे केवळ 13 हजार मताच्या फरकाने शेवटच्या टप्प्यात विजयी झाल्याने जानकर समर्थकांना ईव्हीएमवर विश्वास नसल्याची भावना तयार झाली आहे. यातच राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही ईव्हीएमवर शंका उपस्थित होऊ लागली आहे.त्यामुळे आता मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव असून ज्या गावाने थेट आता बॅलेटवर मतदान घेण्याचे मोठे पाऊल उचलले आहे.
3 डिसेंबरला होणार बॅलेट पेपरवर मतदान..
या मतदान प्रक्रियेमध्ये विरोधी भाजपचे मतदार सामील होणार का? हा प्रश्न निर्माण झाला असून या मतदानाचा पुढाकार गावातील एका गटाने घेतल्याने दुसरा गट आता काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदान प्रक्रियेस शासन स्तरावरून कर्मचारी पुरवणे अशक्य असल्याने ग्रामस्थांनी प्रसिद्धी माध्यमांकडूनही मतदान प्रक्रिया पार पाडायची तयारी केल्याचे दिसून येत आहे. यासाठी 3 डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून लगेच चारनंतर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.