कोल्हापूर: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा बजावणाऱ्या होमगार्ड विभागाची भरती प्रक्रिया कोल्हापुरात सुरू आहे. मात्र, उमेदवारांकडून या भरतीकडे पाठ फिरवण्याचे दिसून आले. जिल्ह्यात पंधरा दिवस झालेल्या धुवादार पावसामुळे भरती प्रक्रियेत व्यत्यय आला होता. अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेली होमगार्ड भरती २६ सप्टेंबरपासून ३८३ जागांसाठी सुरू झाली. पहिल्या दिवशी भरती प्रक्रियेसाठी बोलावलेल्या ३३०० उमेदवारांपैकी तब्बल २४४८ उमेदवारांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे २९५ महिला आणि ५५७ पुरुष उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी आणि मैदानी चाचणी झाली. यातील २९२ उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र ठरल्याची माहिती समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली.
अतिवृष्टी आणि व्हीआयपी बंदोबस्तामुळे भरती प्रक्रिया तीन दिवस पुढे ढकलली होती. अखेर गुरुवारी सकाळपासून पावसातच भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी पोलीस परेड मैदानावर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. मैदानावर चिखल असल्याने धावण्याची चाचणी कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखाना ते शिये पूल या मार्गावर घेण्यात आली. ऐनवेळी मैदानी चाचणीचे ठिकाण बदलल्याने उमेदवारांना कपडे बदलण्याची गैरसोय झाली. गुरुवारी सकाळी ८५२ उमेदवारांनी हजेरी लावली. ८६८ महिला आणि १५८० पुरुष अशा २४४८ उमेदवारांनी भरतीकडे पाठ फिरवली. २९५ महिला आणि ५५७ पुरुष उमेदवार हजर होते. त्यातील २२८ महिला आणि ३३२ पुरुष असे ५६० उमेदवार अपात्र ठरले. ६७ महिला आणि २२५ पुरुष असे एकूण २९२ उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.