महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे गावात एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या वाळणे गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुली कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात बुडाल्या होत्या. यामधील दोन मुलींचा मृत्यू दुर्दैवी झाला, तर एका मुलीला वाचवण्यात यश आलं असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत. या घटनेने वाळणे गावावर शोककळा पसरली आहे.
१२ ते १३ वयोगटातील चार मुली आज रविवारी दुपारी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात पोहायला गेल्या होत्या. पोहत असताना त्यातील तीन मुली बुडाल्या. यावेळी मुलींनी आणि जवळच्या लोकांनी आरडाओरडा केला. यावेळी स्थानिक लोकांनी सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झाला.
तर तीन मुलींना उपचारासाठी तापोळा येथे प्राथमिक उपचार करण्यासाठी आणण्यात आलं. पुढील उपचारासाठी त्यांना महाबळेश्वर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघींना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.