सोलापूर : बोरामणी हत्याकांडाच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवघ्या अडीच एकर जमिनीच्या वादातून एका कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालातून 16 वर्षीय शिवराजवर तब्बल 49 वेळा तलवारीने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्या आईवर 16, तर बहिणीवर 6 वार झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर बोरामणी परिसरात घडली. नंदिनी हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या तीन बंगल्यांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य राहत होते. घटनेच्या रात्री 40 वर्षीय महिला आणि तिचा 16 वर्षांचा मुलगा गच्चीवर झोपले होते. त्यांची 18 वर्षीय मुलगी जवळच असलेल्या स्टडी रूममध्ये झोपली होती.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी काका हातात तलवार घेऊन गच्चीवर पोहोचला आणि झोपलेल्या भावाच्या पत्नीवर हल्ला केला. त्यानंतर त्याने शिवराजवरही वार केले. आईवर हल्ला होत असल्याचे लक्षात येताच शिवराजने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर जखमी झालेल्या शिवराजला आरोपीने स्टडी रूमच्या दिशेने नेले आणि त्याच्या बहिणीवरही हल्ला केला.

बहिणीला वाचवण्यासाठी शिवराजने शेवटपर्यंत प्रयत्न केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. मात्र, त्यालाही आरोपीने पुन्हा तलवारीने वार करून ठार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी स्वतःच्या घरात परतला आणि तलवार तसेच मोबाईल तेथे ठेवून घराला कुलूप लावून निघून गेला.
या प्रकरणात पोलिसांनी 280 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून, 30 साक्षीदारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. जमिनीच्या वादातून हा हत्याकांड घडल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. एकाच रात्री आई आणि दोन मुलांचा जीव गेल्याने या घटनेने परिसर हादरला आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेत या प्रकरणाचा पुढील निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







